स्वस्थ म्हणजेच निरोगी जीवन जगण्यासाठी काय करावे ?

आयुर्वेदामध्ये स्वस्थ राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे याचे खूप सविस्तर पणे वर्णन केलेले आहे. मुळतः आयुर्वेदाचं उद्दिष्ट म्हणजे “स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं” (स्वस्थ व्यक्तीचं आरोग्य रक्षण करणे) व आतुरस्य विकार प्रशमनं” (रोग झालेल्या व्यक्तीचा रोग बरा करणे) हे आहे.

निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदातील दिनचर्ये चे पालन करावे. दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत च्या काळात आचरणात आणावयाची चर्या.

दिनचर्या संबंधी काही महत्वाच्या बाबी –

  1. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे म्हणजेच सूर्योदय होण्याच्या दीड तास अगोदर.
  2. ब्रह्म मुहूर्तावर उठत असाल तर उठल्या वर १ ग्लास कोमट पाणी प्यावे.( सध्या लोकं उगाच १-१ लिटर पाणी उठल्यावर पितात.)
  3. याच काळात प्रातः विधी सुद्धा झाला पाहिजे.
  4. नियमित व्यायाम करावा व्यायाम हा आपल्याला जमेल अशाच प्रकारचा करावा किंवा योगासन प्राणायाम करावे.
  5. सकाळी ८:३० पर्यन्त पौष्टिक नाष्टा करावा. फास्ट फूड नको, बेकरी पदार्थ वर्ज्य.
  6. दुपारी १२:३० पर्यन्त जेवण ज्यामध्ये प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, खनिजे असावीत.
  7. जेवणानंतर झोपू नका. झोपावच वाटलं तर १५-२० मिनिटे बसल्या बसल्या एखादी डुलकी घ्यावी.
  8. कामावर असाल तर दर तासाला उठून थोडे फिरा. हात पाय मोकळे करा.
  9. संध्याकाळी ४-५ ला ऋतूनुसार मिळणारे फळं खा. समोसा,कचोरी, वडापाव अशा प्रकारचे पदार्थ खाऊ नका.
  10. कामावर असताना वारंवार चहा पिऊ नका, प्यायचाच असेल तर ग्रीन टी, ब्लॅक टी घ्या. वेळ जात नाही म्हणून उगीच चहा पिऊ नका.
  11. संध्याकाळी ८ वाजेपर्यंत जेवण करावे. जास्तीत जास्त ९ पर्यंत.सकाळच्या तुलनेत पचायला हलके असावे.
  12. रात्री जेवणानंतर शतपावली करावी. उगीच घाम निघेपर्यंत २-४ किलोमीटर जेवणानंतर चालू नये.
  13. रात्री लवकर झोपावे तसेच रात्रीचे जेवण व झोप यामध्ये कमीत कमी दोन ते तीन तासाचे अंतर असावे.

पहा मग ” एक दिवस असेही जगून 

याशिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी –

  • “अन्न तारी, अन्न मारी, अन्न जीवाचा वैरी” या उक्तीप्रमाणे अन्न च आरोग्य, व्याधी, मृत्यु यासाठी कारणीभूत असते. म्हणून अन्न सेवन करण्याचे सर्व नियम पालन करावे. उगीच आवश्यकता नसताना कितीही खाणे, काहीही खाणे, केव्हा ही खाणे चुकीचे आहे.
  • फास्ट फूड – पिझ्झा, बर्गर, मैद्याचे, शिळे, बेकरीचे, हवाबंद पाकीटातील पदार्थ शक्यतो टाळावे.
  • मीठ, गोड पदार्थ व तेलाचा बेताने वापर करावा.
  • मल, मूत्र, अपान वायू, शिंक, जांभई असे १३ प्रकारचे नैसर्गिक वेग आहेत त्याना रोकुन ठेऊ नये.
  • काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार बाळगू नये.
  • रसायन सेवन करावे. रसायन म्हणजे अशा औषधी ज्याचे सेवन केले तर शरीरातील सर्व धातू चांगले बनतील व रोगप्रतिकार क्षमता वाढेल. उदा. च्यवनप्राश
  • रसायन औषधामध्ये antioxidants असतात. ते शरीरामध्ये तयार होणाऱ्या फ्री रडिकल्स ना neutralize करतात.
  • पंचकर्म चिकित्सा – पंचकर्म म्हणजे शरीराची शुद्धि करण्याच्या प्रक्रिया. जसे आपण वाहनांची सर्व्हिसिंग करतो, त्याप्रमाणेच आपल्या शरीराची सर्व्हिसिंग करणे म्हणजे पंचकर्म. किमान वर्षातून एकदातरी वैदयाकडे जाऊन पंचकर्म करून घ्यावे.

निरोगी म्हणजे नेमकं काय?

यासाठी आपण जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) आरोग्य म्हणजे काय ते बघू. ” आरोग्य म्हणजे केवळ व्याधी किंवा जन्मत: दोष असणे असे नसून मनुष्य शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्ट्या स्वस्थ असणे होय.”

** शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्ट्या स्वस्थ असण्याची लक्षणे –

१. शारीरिक स्वास्थ्य – शारीरिक रित्या स्वस्थ किंवा निरोगी म्हणजे शरीरातील सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थितपणे होणे. तसेच कुठल्याही आजाराची लक्षण न दिसणे.

२. मानसिक स्वास्थ्य – मानसिकरित्या स्वस्थ असणारी व्यक्ती समाजामध्ये समंजसपणे राहते. अशी व्यक्ती स्वतःची ओळख निर्माण करण्याकरिता प्रयत्न करत असतात, स्वतः वर नियंत्रण असते, स्वतः काही तरी करावे असे तिला सतत वाटत असते, तसेच जीवनामध्ये काही तणाव असतील किंवा अडचणी असतील तर त्यांना सामोरे जाण्याची तयारी असते किंवा त्यातून दुसरा मार्ग निघतो का हे हे पाहण्याची क्षमता असते, स्वतःमध्येच काही द्वंद नसते, इतरांसोबत ऍडजेस्टमेंट करू शकते आणि कुठलाही मानसिक आजार नसतो.

३. सामाजिक स्वास्थ्य – सामाजिक रित्या रित्या स्वस्थ असणारी व्यक्ती समाजातील प्रत्येक व्यक्ती सोबत समंजसपणे राहते.

या सर्व गोष्टी पाहून आपण स्वतः च ठरवावे की आपण निरोगी आहोत की नाही .

निश्चितच वर दिलेल्या टिप्स चे पालन करून नक्कीच आपण निरोगी राहू शकतो व दीर्घायुषी होऊ शकतो.

मित्र आणि कुटुंब सदस्यांसह शेअर करा

प्रशासक

"माहिती भांडार संकेतस्थळ" जगातल्या माहितीचा मराठी भाषेमधील मधील संग्रह आहे. "Mahiti Bhandar Website" is a collection of information from around the world in the Marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!