शेतकऱ्याला बळीराजा का म्हणतात?
’बळीराजा’ची कथा…..नेमके सत्य काय!!?
‘बळीराजा’ नेमका कोण होता?
आपल्याकडे शेतकऱ्याला बळीराजा असे म्हणायची पद्धत आहे. ‘इडा-पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी म्हणदेखील आहे. अनेकदा इथे बळीराजा म्हणजे वामनावतारात ज्या बलीचा उल्लेख होतो तोच असा गैरसमज झाला आहे; किंबहुना पसरवला गेला आहे. प्रत्यक्षात मात्र तसे नाही! बली हा असुर वंशातील राजा होता. ज्यांच्याकरता भगवंताने नरसिंह अवतार घेतला अशा विष्णूभक्त प्रह्लाद महाराजांचा तो नातू. मात्र त्याला आपल्या हुद्द्याचा प्रचंड गर्व होता. त्यामुळे अनेकदा प्रजेलाही त्याचा जाच सहन करावा लागे. शेतकरी आणि हा बली यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आहे असे म्हणायचे असल्यास; आमच्या शेतकरी बांधवांचे पूर्वज असुर होते असे सुचवायचे आहे काय?!
मग शेतकऱ्यांचा ‘बळीराजा’ म्हणजे कोण?
उत्तर अतिशय सोपे आहे. भगवान श्रीकृष्णाचे बंधू आणि शेषाचे अवतार मानले गेलेले बलराम हे शेतकऱ्यांचे ‘बळीराजा’. संदर्भासह स्पष्ट करतो; बलरामाच्या मूर्ती पहा. द्विभूज अशा या मूर्तींच्या हातात काय दिसते? तर मुसळ किंवा गदा आणि नांगर!! जे मुसळ आणि नांगर शेतकरी बांधवांचे चिह्न म्हणूनच प्रसिद्ध आहे. तीच दोन्ही आयुधे या बलरामांच्या हातात आहेत. बलरामांनाच उद्देशून बलीराम, बल, बली, संकर्षण अशी विविध नावेदेखील वापरण्यात आली आहेत. याशिवाय; भगवान श्रीकृष्णांनी वसवलेल्या द्वारिकानगरीचे सम्राटपद हे बलरामांकडे होते. म्हणून ‘बळीराजा’ असेही त्यांना म्हटले जाते.
गैरसमज झाला कुठे?
- वामन का घाली बळी रसातळी || प्रश्न जोतीमाळी || करी भटा || (महात्मा फुले समग्र वाङ्ग्मय; पृष्ठ ५७२)
याच ओळींचा आधार घेऊन असुरराज बली; म्हणजेच शेतकऱ्यांचा ‘बळीराजा’ असे समज पसरवले जातात. ज्यात काही तथ्यांश नाही हे आपण यापूर्वी पाहिले आहेच.
मग बलीचे नेमके काय झाले?
असुर असलेल्या बलीराजाला झालेला अहंकार मोडून काढण्यासाठी विष्णूने वामन अवतार घेतला ही कथा आपल्याला परिचित आहेच. तीन पावलांत तीन भुवने पादाक्रांत करून त्याने बळीला पाताळात गाडले असेही आपण वाचतो. मात्र; हे अर्धसत्य आहे! मुळात ‘वामन’ या शब्दाचा संस्कृतनुसार अर्थ ‘छोटा’ असा आहे; तो जातीविशेष नाही हे लक्षात घेतले पाहिजे. विष्णूने वामनरूपांत भिक्षा मागितली आणि नंतर पुढे जाऊन ‘त्रिविक्रम’ हे अक्राळविक्राळ रूप धरण करून तीन भुवने व्यापली अशी कथा आहे. थोडक्यात; वामनाने हे कार्य केलेलेच नाही! मूर्तीशास्त्रानुसार; ‘वामन’ आणि ‘त्रिविक्रम’ या दोन्ही मूर्ती भिन्न बनवल्या जातात. (अधिक माहितीसाठी वाचा: ‘विष्णूमूर्ते नमस्तुभ्यम्| – डॉ. गो. ब. देगलूरकर). त्यापुढील महत्वाची गोष्ट म्हणजे या बळीला पाताळात ‘गाडलेले’ वगैरे नाही. आपल्याकडे सप्तपाताळ सांगितले आहेत. यातील ‘सुतल’ नामक पाताळाचा राजा म्हणून बलीची नेमणूक करण्यात आली. आणि तो महाराज प्रह्लादांचा नातू असल्याने तसेच स्वतः विष्णूभक्त असल्याने; त्याच्या मागणीनुसार; स्वतः विष्णू हे त्याचे द्वारपाल बनून राहिले अशी संपूर्ण कथा आहे! इतकंच नाही तर पुढे विष्णूने श्रीकृष्णावतार धारण केला तेव्हा या बलीचा वंशज असलेल्या बाणासुराच्या मुलीबरोबर आपला नातू अनिरुद्ध याचा विवाह करून दिला. म्हणजेच हे वंशपरंपरागत वैरदेखील नव्हते!!
आता काही महत्वाचे प्रश्न….
- ‘वामन’ आणि ‘परशुराम’ या दोन विष्णू अवतारांना ते ब्राह्मणस्वरुपात दाखवले गेल्यानेच टीकेचे लक्ष्य केले जाते हे आपण नेहमी बघतोच. भगवान परशुरामांनी आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार आपल्या मातेचे मस्तक धडावेगळे केले असा आरोप करून त्यांचा हीनशब्दांत उल्लेख करणारे लोक; भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचा आतेभाऊ असलेल्या शिशुपालाचा वध केला होता यासंबंधीही असेच हीन शब्द वापरणार का?
- भगवान वामनाने बळीराजाचे राज्य हडपले दिला असे वाटेल ते ठोकून देणारे लोक; भगवान श्रीरामांनी रावणाचे राज्य हडपले असेच म्हणणार का?
जर या दोन्ही प्रश्नांची नकारार्थी असतील तर असा दुटप्पीपणा का? याचे उत्तर द्यावे लागेल. आणि ही उत्तरे होकारार्थी असतील; तर हे लोक कोणत्या विशिष्ट जातीविरुद्ध नसून संपूर्ण हिंदू समाज खिळखिळा करणे या उद्देशानेच त्यांची ही दिशाभूल सुरु आहे हे स्पष्ट होते. गोबेल्सच्या प्रचारतंत्रानुसार; एखादी खोटी गोष्ट दहा वेळा रेटून सांगितली की अकराव्यांदा समोरच्याचा बुद्धिभेद होतो आणि त्यानंतर मात्र तीच गोष्ट खरी वाटू लागते. याकरताच अशा खोट्या आणि हेतुपुरस्सर केलेल्या अपप्रचारांना न भूलता आपले ऐतिहासिक ग्रंथ व त्यातील संदर्भ तरुण पिढीने स्वतः मुळाबरहुकुम वाचावेत; समजावून घ्यावेत. मात्र त्यासाठी संस्कृत भाषा येणे अनिवार्य आहे. अर्थात; ती शिकण्यासाठी आम्ही सकारात्मक मेहनत करणार की अशा नकारात्मक भूलथापांना भुलणार हा खरा प्रश्न आहे.
स्रोत : लेख फेसबुक वरून कॉपी केला आहे