रक्षाबंधन या सणाचा इतिहास काय आहे?
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला’रक्षाबंधन’ म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सम्मान हा सुद्धा या सनामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सम्मान देणाऱ्या आतल्या गाठीच्या लोकांना तिचे महत्व कळत नाही. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:|’ ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणी पासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न ह्या सनाद्वारे केला जातो.
“राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ – “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.
रक्षाबंधन साजरा करण्यामागे अनेक कारणं आहेत:
- रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.
- महाभारतात श्री कृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे आजन्म रक्षण करण्याचा ठरवले
- इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता.
- चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.
अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/