महाराष्ट्र राज्याचे नाव ‘महाराष्ट्र’ कसे ठरवण्यात काय आले?

महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्ति विषयी मांडले गेलेले विचार खालीलप्रमाणे:

मराठी माणसांनी दिलेल्या लढ्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचे द्विभाषिक राज्य मोडण्याची अधिकृत घोषणा ८ मार्च १९६० रोजी करण्यात आली. त्यासाठी जेव्हा २३ एप्रिल रोजी लोकसभेत विधेयक मांडण्यात आले, तेव्हा त्यात ‘बॉम्बे राज्य’ आणि ‘गुजरात राज्य’ अशी दोन राज्य निर्माण करण्याची तरतूद होती. तेव्हा खासदार बॅ. नाथ पै, एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रे आदी नेत्यांनी ‘महाराष्ट्र’ नावाचा आग्रह धरला. त्याला इतर भाषिकांचा खूप विरोध झाला. ‘भारत हे एक राष्ट्र असताना त्यात आणखी वेगळे महाराष्ट्र कशाला?’ असा युक्तिवाद करण्यात आला. शेवटी काँग्रेस श्रेष्ठींनी नाखुषीने ‘महाराष्ट्र’ या नावाला संमती दिली.

मराठी लोकांनी आपल्या राज्याला “महाराष्ट्र’ असे नाव देण्याचा आग्रह का धरला, याला इतिहास आहे. याची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी प्रथम आपण ‘राष्ट्र’ ही संकल्पना आणि ‘राज्य’ आणि ‘राष्ट्र’ यातील फरक समजून घेतला पाहिजे. ‘राज्य’ ही त्यातील नागरिकांचे नियमन आणि नियंत्रण करणारी संस्था असते. या नागरिकांत जेव्हा ऐक्यभावना निर्माण होते, तेव्हा राज्याचे राष्ट्र होते.

इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठयांची ओळख ‘राष्ट्र’ म्हणून स्वीकारली होती. इंग्रज अधिकारी आणि लेखक ऍकवर्थ याने लिहिले की “या देशातील इतर लोक जाती, पंथ, धर्म, जमाती आदी कारणांमुळे संघटित झालेले दिसतात, परंतु मराठे हे एक राष्ट्र आहे आणि त्याचा ब्राह्मणांपासून कुणब्यांपर्यंत सर्वाना अभिमान आहे”. वॉरेन हेस्टिंग्ज असे म्हणाला होता की, “हिंदुस्तानातील आणि दख्खनेतील सर्व लोकांमध्ये केवळ मराठे असे आहेत की, ज्यांच्यापैकी प्रत्येकाच्या मनावर राष्ट्रभावना कोरलेली आहे”. ऑर्थर वेलस्ली म्हणाला होता की, “स्वतःची विशिष्ट ओळख आणि भाषा असलेले मराठे ही भारतातील एकमेव राजकीय शक्ती होती, जी राष्ट्रीय भावनेने जोपासली होती”.

चौथ्या शतकात ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा उल्लेख प्रथम आढळतो. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण या गावी सापडलेल्या स्तंभलेखात हा उल्लेख आहे. वरहमिहिराच्या इ.स. ५०५ मधील बृहतसंहितेत ‘महाराष्ट्रीय’ या अर्थी ‘महाराष्ट्रा:’ हा शब्द आला आहे. त्याच काळात दंडी कवीने ‘महाराष्ट्रातील भाषा मुख्यतः प्राकृत आहे’ असे लिहिले आहे. महानुभाव पंथाच्या साहित्यातही सातशे वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र’ हा शब्द आढळतो. ‘महाराष्ट्र राज्य’ हे शब्द ‘जेधे करीना’ आणि ‘शिवचरित्रप्रदीप’ मध्ये आले आहेत. समर्थ रामदास स्वामींनी ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’ असा प्रेरक संदेश दिला.

‘महाराष्ट्र’ या नावाला अशी पार्श्वभूमी असल्यामुळे मराठी माणसाने त्या नावाचा आग्रह धरला आणि काँग्रेस श्रेष्ठींनी तो मान्य करावा लागला. शेवटी १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.


  • ‘महाराष्ट्र’ या शब्दाची उत्पत्ति महारांचे राष्ट्र ते महारराष्ट्र = महाराष्ट्र (मोल्सवर्थ)
  • महार व रट्ट या दोन जाती नामांचा संयोग होऊन ‘महारट्ट’ = महाराष्ट्र (डॉ. केतकर)
  • महाराष्ट्राचा त्याग करून जाणाऱ्या ‘मातिया हरी’ यांच्या तोंडचे ‘तुझेया महाराचा महाराष्ट्र होऊनि मीची जातु असे’ (लीळाचरित्र)
  • महानराष्ट्र – मोठे राष्ट्र ते महाराष्ट्र (डॉ. पा. वा. काणे)
  • मल्लराष्ट्र (मल्ल – म्हार – मार) = मल्लांचे राष्ट्र ते महाराष्ट्र (डॉ. ओप्पर्ट).

संदर्भ: वस्तुनिष्ठ मराठी, डॉ. प्रा. प्रवीण चंदनशिवे, सुकाणू प्रकाशन, कराड, चौथी आवृत्ती (२७ फेब्रुवारी २०११-मराठी भाषा दिन), पृष्ठ क्र.१४३.


प्राचीन काळी उत्तर भारतातील लोकांची मूळ भाषा ही संस्कृत होती पण प्रदेशानुसार व काळानुरूप संस्कृत मधील शब्दांचा अपभ्रंश होऊन नवीन भाषांनी जन्म घेतले. अशा एकूण २१ भाषा होत्या ज्यांना प्राकृत भाषा म्हणतात. उत्तरेतील सुसंस्कृत लोकांच्या दक्षिणेतील अरण्यांकडे येण्यापूर्वी येथे अनेक समूहांचे लोक राहात असे ज्यांच्या संस्कृती ही वेगवेगळ्या होत्या व भाषाही. आजच्या महाराष्ट्राच्या भागात त्या काळी रठ्ठ नावाचे लोक राज्य करीत होते. उत्तरेतून आलेल्या लोकांनी हा प्रदेश पादाक्रांत केल्यावर ह्या रठ्ठ नावास संस्कृत मध्ये राष्ट्रिक असे नाव दिले. कालांतराने ह्या राष्ट्रीकांंस महाराष्ट्रिक व त्यांच्या प्रदेशास महाराष्ट्र देश असे नाव दिले.


डॉ. भांडारकरांनी सम्राट अशोकच्या शिलालेखांचा आधार घेऊन असे प्रतिपादन केले आहे की, प्राचीन काळी या भूमीवर रस्टिक लोक राहात होते आणि त्यावरून रट्ट, महारट्ट आणि महाराष्ट्र असे बदल होत गेले.


मराठी भाषेचा पहिला कोष ज्याने तयार केला, त्या मोल्सवर्थ यांच्या मते या भागात प्राचीन काळी महारांची वस्ती होती आणि त्याच्यावरून या भागाला महारराष्ट्र असे नाव होते जे पुढे महाराष्ट्र झाले. डॉ. विल्सन यांनी ‘गाव तेथे महारवाडा’ या म्हणीचा आधार घेत या मताला दुजोरा दिला आहे.


तुम्ही तुमची प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये सांगा …..

मित्र आणि कुटुंब सदस्यांसह शेअर करा

प्रशासक

"माहिती भांडार संकेतस्थळ" जगातल्या माहितीचा मराठी भाषेमधील मधील संग्रह आहे. "Mahiti Bhandar Website" is a collection of information from around the world in the Marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!